रात्रीचा पाऊस - भाग ३
- Amol Bakshi
- Jul 27, 2024
- 5 min read
कोकणातले डोंगर म्हणजे कोकणातल्या गूढरम्य कथांचे उगमस्थान. भरपूर झाडी. वाटेत करवंदाच्या, कण्हेरीच्या जाळ्या. भरपूर जंगली झाडं. ही ओळखीची, बरीचशी रानटी. पायवाटांचं जाळं. एखाद्या झुडुपामागं जाऊन एखादी वाट अचानक गुडूप होते. या वाटांची माहिती असल्याशिवाय जाण्यात शहाणपणा नाही. वाटांच्या जाळ्यात फसलं की तिथंच फिरत बसायचं. मग चकवा लागला म्हणून सांगायचं. आमच्या घरांना पाण्याच्या हवाली करून आम्ही सगळे डोंगरातून निघालो. पाऊस होताच सोबतीला. पायवाटांमधून छोटे पाण्याचे प्रवाह पाय धुवून काढत होते. आणि त्याचबरोबर पाय खंबीरपणे रोवता येऊ नये याचीही दक्षता घेत होते. त्यामुळं चालणं अजूनच अवघड होतं. झाडांच्या फांद्या मोडून त्या काठ्या आधारासाठी घेतल्या होत्या.

कोकणात आम्ही राहायला गेल्यावर आम्हाला बेगमीचं महत्त्व कळलं होतं. म्हणजे आईबाबांना, मी लहान होतो. चार महिने पावसाचे. काहीही आणायला बाहेर जायचंही अवघड. त्यात आणताना ते पावसात सुरक्षित राहील याचीही खात्री नाहीच. त्यामुळं होता होईल तेवढ्या गोष्टी पावसाळ्याच्या आधी भरून, निवडून, मुंग्या होऊ नये म्हणून पावडर लावून ठेवून द्यायचं. तसं आमच्या घरीही ठेवलं होतं. आम्ही ज्या खोलीत राहत होतो, तो एक मोठी पडवी होती. फरशा घातल्या होत्या. तीन बाजूंना भिंती आणि पऱ्ह्याकडच्या बाजूला खाली तीन चतुर्थांश भागात बांधकाम आणि उतरलेली भिंत म्हणजे मोठ्या खिडक्या. त्यांना लोखंडी सळ्यांचे गज. पऱ्हयाचं पाणी तिथूनच घरात घुसलं. पावसाळ्यासाठी ठेवलेलं धान्य भिजलं. छोटी छोटी भांडी, चमचे, वाट्या त्यातनं वाहून गेल्या. बाबांचा पगार नुकताच झाला होता. घरी नवं गोदरेजचं कपाट घेतलं होतं. घरात पाणी वाढायला लागल्यावर बाबांनी पाण्यातून जात कपाटातून पैसे काढून स्वत:जवळ ठेवले. कपाटाला कुलूप घातलं. त्यावेळी त्यांना ते नुकसान दिसलं. ते घरी असताना डोंगरात प्रचंड मोठा आवाज आला. बाबा आणि उरलेली पुरूष मंडळी घरातून ताबडतोब बाहेर पडली. नदी आणि डोंगराची भेट बहुतेक आमच्या घरी व्हायची होती.
नुसत्या पाण्यात कोलमडून जावं एवढं ते जोशींचं घर तकलादू नव्हतं. चांगल्या चिऱ्याच्या भिंती होत्या. पण दरड कोसळली तर मात्र कशाचंच काही खरं नव्हतं. मागं काय झालं असेल हा विचार करण्याची ते वेळ नव्हती. जीव वाचवायला आम्ही डोंगरवाटांतून निघालो होतो. एकमकांचे हात धरून, मुलांना मध्ये ठेवत आमचा तांडा निघाला होता. पण संकटं अजून संपली नव्हती. ती तशी संपणारही नव्हती. अंगावरच्या कपड्यांवर स्वत:च्या घरातून बाहेर पडावं लागल्यानंतर संकटं तर सुरू होतात. पुढं एक दांडगा पऱ्ह्या होता. म्हणजे आमच्या घराशेजारच्या पऱ्ह्याएवढा मोठा नसला तरी वेग काही कमी नव्हता. डोंगराच्या शिखरावर पडलेल्या पाण्याला घाईनं घेऊन हा गडी खाली नदीला भेटायला निघाला होतात. वाटेत सगेसोयरे ओहळ त्याला भेटत होते.
अडीच तीन फूटाची रूंदी. पण एक पाय जरी त्यात पडला तर नदीलाच भेटायचं. वाटेत आधाला झाड मिळालं तरी हातपाय मोडणं, नाकातोंडात पाणी जाणं, गेलाबाजार कपाळाला खोक पडणं इतपत हानी तरी होणारच. पुढं जायचं असेल तर तो ओलांडणं भाग होतं. कोकणातले लोक काटक आणि धाडसीपण. निम्म्या लोकांनी त्यावरून उड्या मारल्या. पलिकडं गेले. ज्यांना पोहता येत नव्हतं ते बिचकत होते. पोहता येत असले तरी पलिकडं उडी मारण्यासाठी जिगर पाहिजे. तसंही जिथं होतो तिथंही काही सुखाची सुरक्षित परिस्थिती नव्हतीच. त्यामुळं उडी मारण्याशिवाय पर्यायही नव्हता. परिस्थिती तुम्हाला सगळं शिकवते. माझ्या बाबांचं उभं आयुष्य शहरात गेलेलं. असल्या कुठल्याच गोष्टीची त्यांना सवय नव्हती. माहितीही नव्हती. पोहता येत नव्हतं. पण अशा स्थितीत करणार काय? मारली उडी. केली हिंमत.
पुन्हा एकदा आमचा तांडा निघाला. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला प्रभाकर भिडेंचं घर होतं. त्यांच्या घराच्या आवारातचं त्यांचं स्वत:चं गणपती मंदिर होतं. तीसपस्तीस लोकं दारात बघून एखादा घाबरून गेला असता. कदाचित त्यांना ठेवून घेतलंही नसतं. पण तेव्हा माणुसकीचे डोंगर होते. बेटं झाली नव्हती. प्रभाकरकाकाही खाऊनपिऊन सुखी असणारे. पण पावसाळ्याची बेगमी त्यांनी आमच्यावर संपवली असावी. तीन दिवस सकाळ-संध्याकाळचा चहा, तीनवेळा कुळथाचं पिठलं आणि भात. सगळे मिळून पन्नासेक माणसं जेवत होती. गणपतीच्या देवळात, त्यांच्या घरी जिथं जागा मिळेल तिथं ही माणसं विसावत होती. बाहेरच्या जगाशी संपर्काचं रेडिओ हे एकमेव साधन. मला नीटसं आठवत नाही. पण बहुतेक बाबांनीसुद्धा ट्रांझिस्टर बरोबर आणला होता. संपूर्ण जिल्ह्यात पुराचं थैमान होतं. त्या रात्री पडलेला प्रचंड पाऊस, त्यामुळं धरणाचे दरवाजे उघडलेले आणि त्यात समुद्राच्या भरतीचं पाणी खाडीतून आत आलेलं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आमचं पूरग्रस्त होणं. त्यातही आम्ही लपाछपी खेळायचो.
जे रेडिओवर ऐकलं ते डोळ्यांनाही दिसतच होतं. भिडेंचं घर उंचावर होतं. तिथून खाली पाहिलं की लाल रंगाचा समुद्र. फक्त वाहता. त्यातून लाकडाचे ओंडके वाहायचे. कुणाच्या संसारातली एखादी न बुडालेली घागर वर तोंड करत डचमळत हेलकावे खात जायची. कधी कपडे. कधी एखाद्या गायीम्हशीचं कलेवर समुद्रकडं वाहताना दिसायचं.
तीन दिवसांनी पाणी उतरलं. पाऊसही कमी झाला होता. आम्ही आलो त्याच मार्गानं डोंगरातनं घराकडं गेलो. कारण रस्त्यावर चिखलाचा थर चढला होता. घरीही काही फार वेगळी परिस्थिती नव्हती. सुदैवानं आमच्या घरात फरशी होती. त्यावरचा चिखल साफ करणं तुलनेनं सोपं होतं. बाकीच्यांच्या सारवलेल्या जमिनी होत्या. त्या आता चिखलानं माखल्या होत्या. घरभर धान्य कुजल्यान, कपडे भिजल्यानं कुबट वास दाटला होता. आता पुढची वाट बिकट होती. सगळीच माणसं कामाला लागली.
मला आठवतंय, ते संघाचे स्वयंसेवक. हेलिकॉप्टरमधून पोळ्या टाकल्या जायच्या. ही मंडळी पाणी, चिखल, दरड कशाची पर्वा न करता आमच्यासारख्यांपर्यंत पोहोचवत होती. पाणी उतरायला लागलं तसं निरनिराळ्या बातम्यांचा पूर आला. काही अफवा. काही बातम्या. आख्खी बाजारपेठ तीन दिवस पाण्यात होती. जवळपास सगळ्या दुकानांमधला माल अक्षरश: पाण्यात होता. एखाद्या दुकानात कोरडा माल शिल्लक होता. तो दुकानदार एक रूपयाचा बिस्कीटपुडा पाच रूपयांना विकत होता. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार गेली आणि त्याला तंबी मिळाली.
बाबांचे मित्र, शेटेकाका, पाण्याचा जोर वाढताना आमच्या घरून निघाले. जीवाच्या करारावर छातीभर पाण्यातून वाट काढत सुखरूप घरी पोहोचले होते. संगमेश्वरातून मुंबई गोवा हायवे जातो. हायवेवर एका ठिकाणी एक वळण आहे. जवळपास हेअरपिन बेंड. वळणाच्या मधोमध मोठा पऱ्ह्या. एका बाजूच्या डोंगरावरून धडधडत येतो आणि रस्त्याच्या खालून पन्नासएक फूट दरीत तो कोसळतो. तर या वळणावरच्या डोंगराजवळ आमच्या गावातले तिघंजण गेले होते. त्यातले एक होते माझे गुरूजी, पाथरेगुरूजी, दुसरे बाबांच्या शाळेतले शिक्षक, पाडळकरसर आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाही. त्यांचीही घरं पाण्याखाली होती. प्रातर्विधीसाठी तिथं गेले. अचानक डोंगर कोसळला. हायवे बंद झाला. त्यातले एकटे पाथरेगुरूजी कसेबसे वाचले. पुढं कित्येक वर्षं तेही लंगडत चालायचे. आमच्या माहिततली ही दुर्घटना. अशा माहित नसलेल्या कितीतरी घरांत पावसानं असाच हाहाकार माजवलेला होता.
पुरग्रस्तांसाठी शासनाची, विविध सेवाभावी संस्थांची मदत आली. प्रत्येक घरातील व्यक्तीनुसार, धान्याचे वाटे, कपडे घ्यायला रांगेत उभं राहायचं. मुलांना फार मजा वाटायची. आई नंतर सांगत होती की याचकासारखं तांदळाच्या दाण्यालासुद्धा मोताज झाल्यावर डोळ्यात पाणी यायचं. राजा आणि रंक सगळ्यांची एकच अवस्था. खिशात पैसे असतील कदाचित. खरेदी करायला दुकान तरी हवं. आमच्या घरमालकांच्या दुकानातही पाणी शिरलं. कुजलेलं धान्य टाकून दिलं. जे वाचवून वरच्या बाजूला ठेवलं होतं ते पाण्यानं सर्दावलं होतं. त्यामुळं तेही फार उपयोगाचं नव्हतंच. फक्त मऊ पडलेली बिस्किटं आम्ही कित्येक दिवस खात होतो.
पुढं जेवढी वर्षं मी तिथं होतो, त्यातल्या प्रत्येक वेळी रात्रीचा मुसळधार पाऊस झाला की भीती वाटायची. पण त्यानंतर कधीच घरात पाणी आलं नाही. तेवढं एकच वर्ष.
यंदा कोल्हापूर, सांगलीचा पूर बघितला. तीच दृष्य टीव्हीवर, इंटरनेटवर पाहिली. संगमेश्वर आठवलं. आपत्तीग्रस्तांचं दु:ख समजायला आपत्ती सहन करायलाच हवी असं नाही. विचार करणारं डोकं आणि जाणीवा जिवंत असलेलं मन असलं तरी पुरतं. पण मला तशाच संकटातून गेल्यामुळं थोडं जास्त डाचत होतं. त्यात कालपरवा पुण्यात पावसानं कहर केला. आख्ख्या पावसाळ्यात जे घडलं नाही, ते दोन तासांत झालं. आणि यावेळी तर माणसं तयारीतही नव्हती. हा परतीचा पाऊस होता.
ते डायनॉसॉरच्या किंवा गॉडझिलाच्या सिनेमात नेहमी बघितलेलं आठवतं की तो अजस्त्र देह तिथून निघून जातो. आपल्याला वाटतं झालं. वाचली मंडळी. आणि नेमकं त्याच्या शेपटीचा फटका लागतो आणि वाताहत होते. तेच केलं त्या रात्रीच्या पावसानं. माझ्या मुलाच्या शाळेत काम करणाऱी एक महिला, आमच्या सोसायटीतल्या एका काकूंचा सख्खा भाऊ आणि असे कितीतरी आई, बाप, भाऊ, बहिणी, मुलं, मुली अक्षरश: फरपटत बुडवून टाकली रात्रीच्या पावसानं. बाकीचं नुकसान भरूनही येईल. पुन्हा एकदा उदंतेचा हव्यास.
महाभारताच्या काळात सुर्यास्ताला युद्धही थांबवली जात. मग असा कसा पाऊस प्रत्येक वेळी रात्रीचा, आपण बेसावध असतानाच आपल्यावर हल्ला करतो?
(समाप्त)
コメント