top of page
Search

रात्रीचा पाऊस - भाग २

नदीला पूर येतो म्हणजे नेमकं काय होतं हे मला १९८२ साली कळलं. तोपर्यंत मला आपली नदी माहित होती. पुलावरून गाडी जायला लागली की नदी दिसते. तिला नमस्कार करायचा कारण ती पाणी देते आपल्याला. तेवढाच नदीचा माझा संबंध. संगमेश्वरला गेल्यावर नदी रोजच भेटायला लागली. पुलावरूनच. पण आता आम्ही चालत जायचो पुलावरून. त्यामुळं येताजाता नदी दिसायचीच. पावसाळा असल्यामुळं कधीकधी पात्रातून बाहेर यायची. तेव्हाही आमच्या पायऱ्यांपर्यंत आली ती अशी रौद्र वगैरे नाही वाटली. त्यातही रात्र असल्यामुळं ती भीषणता जाणवली नसेल. आणि आमच्या घरात जरी आली नाही, तरी संगमेश्वरच्या बाजारपेठेत पाणी शिरलं होतं. अगदी रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. पण तो पहिला पुराचा अनुभव. रात्रीच्या पावसानं आणलेला रात्रीचा पूर.





त्यावर्षी परत काही पाणी आलं नाही. पुढचा पावसाळा १९८३ सालचा. आता पावसाळ्याची थोडी सवय झाली होती. आणि त्या वेळेपर्यंत तरी ऋतुचक्र इमानदारीत चालायचं. म्हणजे मेमध्ये वळीव, साधारण सात जूनच्या आसपास पहिला पाऊस, पेरणी, मृगाचे मखमली किडे, थोडा जास्त पाऊस, भातलावणी, मुसळधार, चिखल, हिरवे डोंगर, त्यातले धबधबे, मध्येच उघडीप, श्रावणातला पाऊस, मग असा पडत पडत सप्टेंबरपर्यंत संपायचा. मग थंडी, उन्हाळा, पुन्हा पाऊस. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या दिवसात बिरंबोळे यायचे. छोटंसं रोपटं. पानावरून ओळखायचं. त्याची मुळं व्यवस्थित खणून काढायची. तो बिरंबोळा. साल काढायची आणि खायचा. साधारण कुठलंही कंदमूळ चवीला लागतं तशीच याची चव असायची. मोठी मुलं म्हणायची की व्यवस्थित खणलं नाही तर मुळांचं पाणी होतं. सुरूवातीला खरं वाटायचं. एकदा बिरंबोळा खणताना रोपटं तुटलं. तरी मी खणून मूळ बाहेर काढलं. तेव्हा कळलं की असं काही नसतं. कदाचित रोप तुटलं तर नेमक्या मुळापर्यंत पोचता येणार नाही म्हणून ती धमकी असावी. आपल्या व्यवहारातही बऱ्याचदा आपल्याला अशा धमक्या ऐकायला मिळतात. तसाच हाही प्रकार.


तर त्यावर्षीसुद्धा आमचे पावसाळी उद्योग सुरू होते. पुरेसा पाऊस सुरू झाला असावा कारण पऱ्ह्या पूर्ण वेगाने वाहू लागला होता. तेव्हा आम्हाला प्यायचं पाणी म्हणजे विहीरीचं. पावसाळ्यात मोटर बंद. मग रहाटानं ओढायचं. ते काम आईला बरोबर जमायचं. मीही शिकायचा प्रयत्न करत होतो. पण काढणीला जोर पोचायचा नाही. आमचे घरमालक खूपच प्रगतीशील होते. प्लॉटच्या चढऊताराचा व्यवस्थित उपयोग करत उंचावर पाण्याची टाकी बनवली होती. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातल्या जिवंत झऱ्यांमधून पन्हाळीतून पाणी टाकीत पडायचं पन्हाळीसाठी घरच्याच पोफळीचा वापर केलेला. पावसाळा संपला आणि हे पाणी आटलं की मग विहीराला पंप बसवायचा आणि ते पाणी टाकीत आणायचं ते वापरायचं पाणी. प्यायचं मात्र थेट विहीरीतून भरायचं. पावसाळ्यात विहीर वरपर्यंत यायची. तरी तळ दिसायचा. कासवं फिरायची.


जुलैमध्ये नेमहीप्रमाणे पावसाचा जोर वाढला होता. वीज जायचं प्रमाणही वाढलं. म्हणजे सगळं नेहमीप्रमाणं होतं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस थांबला नव्हता. साधरण पाचसहा दिवस सुरूच. बर कोकणातला पाऊस पूर्ण क्षमतेनं पडू लागला की साधारण पाच फुटावरचं दिसणं मुश्किल. तसाच तो सलग पडत होता. दिवसा पाऊस, रात्री पाऊस. निरनिराळ्या गावांमधल्या पुराच्या बातम्या यायला लागल्या होत्या. नदीनं पात्र ओलांडलं होतं. पण एकदोन दिवस तिचा शेतातच मुक्काम पडला होता.


२७ जुलैला असाच दिवसभर कोसळला. तोपर्यंत व्यवहार सुरू होते. पण कमी प्रमाणात. मागच्या वर्षीच्या पुरामुळे गावातल्या लोकांना नाही म्हटलं तरी एक शंका होतीच. रात्र होईपर्यंत नदी शेतातून रस्त्यापर्यंत आली होती. अंधार पडल्यावर नदीत टॉर्चचे झोत चमकत होते. पाणी बऱ्यापैकी वाढलं होतं. मोठी मंड मंडळी खुर्च्या टाकून पाण्यावर नजर ठेवून होते. आधीच्या अनुभवानुसार सामानसुमान उंचावर ठेवायची तयारी होती. घरमालकांचं घर दुमजली होतं. तिथं त्यांनी काही सामान हलवलं होतं. हळूहळू पाणी पहिल्या पायरीपर्यंत आलं. मागच्या वर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या. तरी सगळे म्हणत होते की नाही येणार पाणी. मागच्या वर्षीचा अनुभव होताच. चौथ्या पायरीपर्यंत पाणी आल्यावर काकूंनी ओटी भरली. नदीला रक्षा कर म्हणून साकडं घातलं.


त्या रात्री बाबांचे खास मित्र शेटेकाका आमच्याकडं आले होते. पाण्याची एकंदर स्थिती पाहता आईबाबांनी त्यांना आग्रह केला की इथंच थांबा. कारण पाण्याचं काही खरं नाही. तुम्ही इतक्या लांब रात्रीचे पाण्यातून कसं जाणार. पण काकांनी ऐकलं नाही. पाणी वाढायला लागलं तसं बाबांना ती काळजी लागून राहिली की हे व्यवस्थित पोचले असतील का. कुठं अडकले तर काय करायचं? आख्ख्या गावात फारतर पंचवीस फोन. त्यातले वीस दुकानांमध्येच. ती पाण्याखाली. आणि फोन तर करायचा कुठून? विचारणार तर कसं आणि कोणाला?


पुढं रात्री एकदोन वाजता कधीतरी नदीनं काकूंचं ऐकलं. पाणी माघारी जाऊ लागलं. आम्ही मुलं माडीवरच झोपलो होतो. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पहाटेच्या सुमारास अचानक गोंधळ सुरू झाला. बोलण्याच्या आवाजानं आम्ही उठलो. नदीनं हुलकावणी दिली होती. पाणी आमच्या अंगणात येऊन पोचलं होतं.


आमच्या घरमालकांचं रेशनचं दुकान होतं बाजारपेठेत. ते आणि त्यांचा मोठा मुलगा, भैया, दुकानातला माल सुरक्षित हलवायला गेले होते. इकडं घरी बाबा आणि अजून एक भाडेकरू. तेवढीच पुरूष माणसं. घरमालकांची गाईगुरं होती. गुरं मोकळी सोडली नाहीत तर हकनाक मरणार. बाबांना त्या कामाचा काडीचा अनुभव नाही. पण त्यांनी कसंबसं ती दावी कापली. गुरांना मोकळं केलं. पाणी वाढतंच होतं. तोपर्यंत दादा, आमचे घरमालक आणि भैया दोघंही आले. सोनवी पुलावर छातीभर पाणी होतं. त्यातनं चालत ते आले.



पाणी घराच्या पायरीला लागेपर्यंत सकाळ उजाडली. २८ जुलै. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस. त्याचदिवशी संकष्टीपण होती. मुलं सोडल्यास सगळ्यांचेच उपवास. आम्ही वरच्या मजल्यावर बसून हे सगळं पाहत होतो. सर्वांना अजूनही विश्वास होत की याच्यापुढं पाणी यायचं नाही. आम्हाला खाली यायला बंदी होती. चहा झाला. त्यानंतर पंधरावीस मिनिटांत पाणी घरात घुसलं. आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते त्या वर्षी झालं. गावकऱ्यांची आई, जीवनदायिनी सोनवी नदी, त्यांची खुशाली विचारायला त्यांच्या उंबऱ्यापार आली.


आता मात्र मोठ्यांनी निर्णय घेतला. मुलांना आधी हलवायचं. आमच्या घराशेजारीच चाळ होती. तिथं चार कुटुंबं राहायची. माझे दोन मित्र तिथं राहायचे. आमच्या घराशेजारी वाहणारा पऱ्ह्या होता, त्यानंही पात्र सोडलं. त्याचं पाणी दुसऱ्या बाजूनं घरात घुसलं. आता तिथं थांबून चालणार नव्हतं. पाऊस सुरू होताच. आमचे घरमालक, दादा, उंचापुरा धिप्पाड इसम. जसं शरीर तसंच काळीज.


घरात छातीभर पाणी. डबे भांडी तरंगताहेत. एका खांद्यावर मी आणि दुसऱ्या खांद्यावर त्यांचा मुलगा, शैलेश. त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन गोष्टी करायच्या. एक म्हणजे दार आलं की खाली वाकायचं आणि दुसरं पाण्यामुळं दार मिटलं जाणार नाही याची काळजी घ्यायची. आम्हाला दोघांना मजा वाटत होती. दार दिसलं की आम्ही जोरात ओरडून एकमेकांना सांगायचो. खाली वाकून दार उघडून धरायचं. दादा त्यातून पुढं जायचे. अशी तीन दारं पार केली. परसात आलो. पाऊस होताच. मध्येच एक गटार होतं. आम्हाला साधारण त्याची जागा माहित होती. गटार पाण्याखाली गेलेली. दादांना भीती ही की जर त्यांचा पाय पाण्यात गेला तर आम्ही पाण्यात पडणार. अंदाज घेत घेत त्यांनी गटार ओलांडली. आम्हाला सुरक्षित जागी सोडलं. नंतर माझ्या दोन्ही मित्रांना त्यांनी याच पद्धतीनं तिथं आणलं. तोपर्यंत भैयानं गायीच्या वासराला लहान बाळासारखं हातात धरून आणलं. यंदाच्या पुरात अशा दृष्यांचे फोटो पाहिल्यावर दादा आणि भैयाच दिसले मला तिथं.


कोकणातले संडास पऱ्ह्याकाठी असतात. आमचा थोडा उंच होता. आमची सुरक्षित जागा. मुलांना आतमध्ये ठेवलं आमच्या आया छत्री घेऊन बाहेर. पुरूष मंडळी एकेकाला तिथं आणून सोडत होते.


पाणी कमी होत नव्हतं. कधी होणार माहित नव्हतं. तिथंच थांबून उपासमारीचीच शक्यता. पुरस्थिताच कसा सामना करायचा कुणालाच माहिती नव्हती. आमच्या घरातले आणि जवळच्या चाळीतले आठ कुटुंबातले साधारण तीस-पस्तीस लोक. एवढे सगळे जण जाणार कुठं. घराच्या पुढच्या बाजूला नदीचे पाणी. एका बाजूला पऱ्ह्या आणि पाठीमागं डोंगर. शेवटी असं ठरलं की डोंगरातून वाट काढत काढत जायचं. आमच्या माभळ्यातली (आम्ही राहत होतो त्या भागाचं नाव) काही घरं उंचावर होती. त्यांच्यापैकी एका ठिकाणी तरी पोचलं पाहिजे. त्यासाठी डोंगरातून जायचं. पावसाळ्यात आम्ही शक्यतो डोंगरात जात नव्हतो. उन्हाळ्यात जायचो. करवंदासाठी. आता त्या डोंगराच्या निसरड्या वाटेतून जायला लागणार होतं. चप्पल नव्हत्याच पायात. जीव तर वाचवायला हवा.



(क्रमश:)


 
 
 

Comments


bottom of page